मंदिराविषयी

श्री चिंतामणी देवस्थान हे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे, चक्रावती नदीच्या काठी असलेले श्री गणेशाचे प्राचीन मंदिर आहे. प्राचीन काळी हे स्थान 'कदंब क्षेत्र' म्हणून ओळखले जात असे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आणि भारतातील श्री गणेशाच्या एकवीस क्षेत्रांपैकी एक म्हणून या स्थानाला विशेष महत्त्व आहे.
चिंता दूर करणारा चिंतामणी
'चिंता' दूर करतो तो चिंतामणी. श्री चिंतामणीच्या चरणी प्रार्थना केल्याने मनातील चिंता दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
इंद्राची कथा
गणेश पुराण व मुद्गल पुराणातील कथेनुसार, गौतम ऋषींच्या शापामुळे देवराज इंद्र व्यथित झाले होते. शापमुक्तीसाठी त्रिदेवांच्या सल्ल्याने इंद्राने या स्थानी उत्तराभिमुख बसून दीर्घ तपश्चर्या केली. इंद्राच्या तपाने प्रसन्न होऊन श्री गणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले. इंद्र उत्तरेकडे तोंड करून बसले असल्याने श्री गणेश दक्षिणेकडे तोंड करून प्रकट झाले; म्हणूनच येथील श्री चिंतामणीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. श्री गणेशाच्या दर्शनाने इंद्र शापमुक्त झाले.
कलियुग येणार हे जाणून लोककल्याणासाठी श्री चिंतामणीने या स्थानी कायम वास करावा, अशी प्रार्थना इंद्राने केली, अशी श्रद्धा आहे.
गणेश कुंड व गंगा
अभिषेकासाठी इंद्राने पाणी मागितले, तेव्हा श्री गणेशाने आपल्या अंकुशाचा प्रहार करून गणेश कुंड निर्माण केले, अशी कथा आहे. इंद्राने गंगेच्या जलाने श्री चिंतामणीला अभिषेक केला आणि गंगा या कुंडात विलीन झाली. दर दहा-बारा वर्षांनी गंगा श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी कुंडात प्रकट होते आणि मूर्तीच्या चरणांना स्पर्श करून परत जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये कुंडात पाणी आले तेव्हा दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
भूमिगत मंदिर व दक्षिणाभिमुख मूर्ती
मंदिराचा गाभारा जमिनीच्या पातळीपासून सुमारे २७ ते ३० फूट खोल आहे. पायऱ्या उतरून गाभाऱ्यात गेल्यावर सुमारे साडेचार फूट उंच, दक्षिणाभिमुख श्री चिंतामणीचे दर्शन होते. हे मंदिर सातव्या-आठव्या शतकात बांधले गेले, असे मानले जाते. गणेश पुराण, स्कंद पुराण व मुद्गल पुराणात या क्षेत्राचा उल्लेख आढळतो.
उत्सव
माघ शुद्ध प्रतिपदेपासून श्री गणेश जन्मोत्सवाला सुरुवात होते. माघ शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जन्म, त्यानंतर महाप्रसाद, दहीहंडी महोत्सव आणि महाशिवरात्रीपर्यंत चालणारी कळंबची यात्रा, असा देवस्थानचा वार्षिक उत्सव साजरा होतो. आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या काळात दररोज पहाटे काकड आरती व नगर परिक्रमा दिंडी निघते.
देवस्थानच्या सेवा
- अल्प दरात भोजन प्रसाद (अन्नदान सेवा)
- संकष्टी चतुर्थीला साबुदाणा खिचडी प्रसाद
- काकड आरती दिंडीतील भाविकांसाठी फराळ
- भक्त निवास, मंदिर सभागृह व हिरकणी कक्ष
- विनामूल्य चप्पल स्टँड